‘नवनीत राणा आता तुम्ही भानावर या, अन्यथा शिवसेनेच्या रणरागिणी तुम्हाला ताळ्यावर आणतील’

 मुंबई : मागासवर्गीय (Backward Class) असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केला होता. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला ( Omprakash Birla) यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं आहे. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांच्या ताब्यात असतानाही चांगली वागणूक दिली गेल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे संजय पांडे यांनी केलेल्या ट्वीटनंतर शिवसेना  आक्रमक झाली असून नवनीत राणा यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी याबाबत ट्वीट करून राणा यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्या म्हणाल्या, नवनीत राणा, हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही, याचे भान राखा. दुसऱ्याने लिहून दिलेले स्क्रिप्ट (Script) वाचुन नाटक करणे हे तुमच्या चित्रपटात ठीक होते, आता भानावर या, अन्यथा शिवसेनेच्या रणरागिणी तुम्हाला ताळ्यावर आणतील.असं त्यांनी म्हटले आहे.