मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा शिवसैनिक… कायंदे यांचा शेलार यांना इशारा

मुंबई – हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पुन्‍हा एकदा सरकारवर तोफ डागली हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणा-या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळापासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज इलेक्‍ट्रॉनिक मिडियाशी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

ते म्‍हणाले की, ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणंचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो ? असा सवाल त्‍यांनी केला.

हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? या शेलार यांच्या विधानाचा शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी समाचार घेतला आहे. आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक (shivsainik) तुम्हाला पळता भूई सोडणार नाही, असा इशारा कायंदे यांनी दिला आहे.

आतापर्यंत कोरोना परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात राहिला आहे, असंही कायंदे यांनी म्हटलं आहे. शेलार यांची टीका आणि कायंदे यांचं त्यावरच प्रत्युत्तर यामुळे हिंदू सणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आगामी काळात आमने सामने येण्याची चिन्हे दिसत आहेत.