अनेक विरोधी नेते परदेशात पळून जाण्याच्या तयारीत; योगी आदित्यनाथ यांचा दावा

महाराजगंज : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. महाराजगंज जिल्ह्यातील सिसवा या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणूक प्रचार सभेत योगी आदित्यनाथ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष (भाजप) राज्यात पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. टर विरोधक नेते हे परदेशात पळून जाण्याची तयारी करत आहेत. यावेळी बोलताना तीनशे प्लसचे लक्ष्य पूर्ण करून पुन्हा एकदा भाजप बहुमताचे सरकार स्थापन करेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

योगी म्हणाले,विरोधकांपैकी कोणी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न करत आहे, तर कोणी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत आहे. भाजपचा नारा ‘सबका साथ और सबका विकास’ आहे, तर सपाचा नारा ‘सबका साथ, मात्र सैफई परिवाराचा विकास’ असल्याचा दावा योगींनी केला. राज्यात भाजपचे सरकार आल्यास गोरगरिबांच्या जमिनी हडपणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, देश व राज्याच्या सुरक्षेशी कोणालाही खेळू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

5 वर्षांपूर्वी राज्यात लोकांना वीज मिळत नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तेव्हा वीजेची जात-धर्म असायची, मग वीज नव्हती. मात्र भाजप सरकारच्या राजवटीत कोणताही भेदभाव न करता सर्वांना वीज मिळत आहे. ते म्हणाले की, आता तरुणांना रोजगार मिळत असून शाळा, महाविद्यालये, आयटीआय, विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये उभारली जात आहेत. महाराजगंजमध्येही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे ते म्हणाले.

यापूर्वी, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींची खिल्ली उडवली होती आणि सांगितले होते की, जनतेने बाबा मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) यांना गोरखपूर येथील त्यांच्या घरी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी पॅकर्स आणि मूव्हर्सला बोलावले आहे आणि गोरखपूरच्या हवाई प्रवासासाठी तिकिटेही खरेदी केली आहेत.