अनेकांचा संजय राऊत यांच्यावर राग आहे, हा राग काढण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होतोय – सावंत

Mumbai – राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. शिवसैनिक जमू लागल्याने पोलिसांचा आणखी फौजफाटा मागविण्यात आला आहे. राऊत यांना ईडी आज ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यांना ईडीच्या कार्यालयात नेले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेकडून या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सुडाच्या कारवाईचा आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका केली (Arvind Sawant Criticized ED) .संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणात अनेकदा भूमिका स्पष्ट केलेले आहे. पत्राचाळ कुठे आहे हे देखील मला माहित नसल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तसेच लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाहीत. अधिवेशन संपल्यानंतरची तारीख मागितली होती. यापूर्वीही दोन-तीन वेळा राऊत चौकशीला सामोरे गेले होते. त्यामुळे चौकशीला सामोरे जात नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर संजय राऊत भूमिका मांडत असतात ( Sanjay Raut takes stand on political situation ). त्यांच्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने त्यामुळे कारवाई केली जात आहे. अनेकांचा त्यांच्यावर राग आहे. हा राग काढण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होतोय, असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घ्यावे, यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सावंत म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण ?

पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.