मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा आला चर्चेत; तुळजापुरातून मंत्रालयाकडे निघाले मराठ्यांचे वादळ

तुळजापूर – मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी शक्तीपीठ तुळजापूर ते मंत्रालय मराठा वनवास यात्रेस शनिवारी सकाळी तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन सुरुवात झाली. शासनकर्त्यांना मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण देण्याची सदबुध्दी दे असे साकडे योगेश केदार, सुनिल नागणे, प्रताप कांचन यांनी घालुन हलगीच्या कडकडटात टाळ मृदंग गजरात श्री तुळजाभवानी मंदीर महाद्धार समोरुन आरंभ झाला.

शनीवारी सकाळी संयोजकांनी प्रथम देवीदर्शन घेवुन होमकुंडा समोर आरती करुन देवीला साकडे घालण्यात आले.त्यानंतर महाद्वारासमोर शाहीर कांबळे यांचा पोवड्यांचा कार्यक्रम झाला नंतर हलग्याचा कडकडटात टाळमृंदग गजरात शेकडो बालवारक-यांच्या समावेत या पायी याञेला आरंभ झाला.ही पायी वनवास याञा . छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी मुंबई येथे पोहचणार आहे.

यावेळी बोलताना संयोजक योगेश केदार म्हणाले , मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation ) देण्यास सरकारे, राजकिय पक्ष असमर्थ ठरल्याने ओबीसीमधुन आरक्षण मिळवण्यासाठी ही याञा काढण्यात येत आहे. संविधानअधीन राहुन हा आमचा मराठा आरक्षण लढा असुन आरक्षण कायदा जोपर्यंत होणार नाही तो पर्यत मुंबई सोडणार नसल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या याञेत बाल वारकरी टाळमृंदगाचा गजर करीत मोठ्या संखेने सहभागी झाले होते. श्रीतुळजाभवानी मंदीरापासुन आरंभ झालेली याञा भवानी रोड मार्गे छ. शिवाजीमहाराज पुतळ्या जवळ आली येथे शिवाजीमहाराज यांना अभिवादन करुन घाटशिळ घाटातुन ती सिंदफळ स्थित श्रीमुदगुलेश्वर मंदीरात पोहचली तिथे दुपारचे भोजन करुन विश्रांती घेवुन सांयकाळी पुनश्च मार्गक्रमण सुरु झाले.

ही ४७५ किलोमीटरची यात्रा सोलापूर, मोहोळ, इंदापूर, उरुळीकांचन, पुणे आणि मुंबई पर्यंत पोहोचणार आहे.पहाटे पाच वाजेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच वाजेपासून आठ वाजेपर्यंत ही यात्रा पायी चालणार आहे. उन्हाच्या काळात विश्रांतीचा वेळ असणार आहे.