वीर सावरकरांना मराठी माणूस कधीही विरोध करूच शकत नाही – शरद पवार

नाशिक  :- आपल्याला नव्या पिढीतून रोबो घडवायचे नाहीत. माणसं घडवायची आहेत. त्यासाठी मराठी मन जपायला हवं आणि ते मातृभाषेतूनच जपलं जाऊ शकतं असा माझा विश्वास आहे. साहित्य रसिकांना माझी विनंती की, त्यांनी मराठी भाषिकांनी मराठी साहित्य नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. संमेलनाच्या समारोप प्रसंगी नाशिकच्या गोदाकाठी हा साहित्य कुंभमेळा यशस्वीपणे आयोजित करणाऱ्या लोकहितवादी मंडळाचे, संमेलानाध्यक्षांचे तसेच सहभागी साहित्यिक व साहित्यप्रेमींचे मी मन:पुर्वक अभिनंदन करतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केले.

लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे खासदार शरदचंद्र पवार, स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ,ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,  खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत गोडसे,कार्यवाह दादा गोऱ्हे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, हेमंत टकले, पंकज भुजबळ, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, दीपक चंदे, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य प्रशांत पाटील, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, किरण समेळ, प्रतिभा सराफ, प्रशांत देशपांडे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार शरदचंद्र पवार म्हणाले की,इंग्रजी वाघीणीचे दूध असेल पण एतदेशीय भाषांच्या विकसनावर ते विरजनाचं काम करत होतं . विसाव्या शतकाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या संवर्धनाचा विडा अनेक राजकीय , समाजसुधारक , सुशिक्षित लोकांनी उचलला . महात्मा ज्योतीराव फुले , सावित्रीबाई फुले , महादेव रानडे , गोखले , आगरकर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , वि . दा . सावरकर कितीतरी नावे घ्यावीत ज्यांनी राजकीय अथवा सामाजिक कार्याबरोबरच मराठी साहित्याची सेवा केली . मराठी भाषेच्या संवर्धनाची तळमळ असणाऱ्या सुशिक्षितांमध्ये ज्ञानकोशकार तथा श्रीधर व्यंकटेश केतकरांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल . छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोशाचा घालून दिलेला आदर्श त्यांनी अंगिकारला , केतकरांना नेहमी वाटे की , मराठी माणसाचे बौद्धिक स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर मराठी भाषेचे स्वामीत्व अबाधित राहिले पाहिजे . देशी भाषेत राज्यकारभार असणारे सरकार खरे सरकार अशी त्यांची भुमीका होती . न्यायालयीन निवाडे देशी भाषेत व्हावे असे ठाम त्यावेळी त्यांनी मांडले होते . राज्यकारभारात मराठी आली आहे पण दुर्दैवाने आजही न्यायालयीन निवाडे सामान्य माणसांसाठी दुर्बोध आहेत असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज गेले पण अध्यापन क्षेत्रात मराठी भाषेचा प्रवास तसा खडतर राहिला. भाषावार प्रांतरचनेनुसार राज्ये अस्तित्वात येत असताना भाषिक अस्मितेचा अंगार मुलत होता. भाषावार राज्य निर्मितीनंतर राज्यांतर्गत भाषेची अभिवृद्धी होणे अपेक्षित होते , परंतू तसे म्हणावे त्या वेगाने घडत नव्हते , पदवी परीक्षेला मराठी विषय पहिल्यांदा १९२१ साली आला. मात्र आपणास आश्चर्य वाटेल की मुंबई विद्यापीठात मराठी विभाग स्वातंत्र्यानंतर २२ वर्षांनंतर म्हणजे १९६९ -७० मध्ये सुरू झाला . मराठी भाषेच्या संवर्धनात स्व . यशवंतराव चव्हाणांनी मात्र अतिशय कष्ट घेतले. ह्या प्रसंगी त्यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करणे औचित्याचे आहे . ते स्वतः एक उत्तम लेखक तर होतेच पण साहित्यवाचनात त्यांची आजही कोणी बरोबरी करू शकत नाही असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, यशवंतरावांच्या कालखंडात हे जोमाने चालणारे प्रयत्न नंतरच्या काळात थंड झाले. ग्रंथनिर्मिती मंडळ आता बंद पडले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडली याचे सिंहावलोकन करण्याची वेळ आता आली आहे . राज्य मराठी भाषिकांचे राज्य म्हणून निर्माण झाले त्या राज्यात ममराठी भाषे मचे नेमके काय झाले ? आपण आपल्या भाषेच्या जतनासाठी संवर्धनासाठी इतक्या वर्षात काय केले ? आज मराठी भाषा नेमकी कुठे आहे ? याचा लेखाजोखा मांडला जावा आणि मराठी भाषेच्या सर्वागिण वृद्धीसाठी राज्यशासनाने पुन्हा कार्यक्रम हाती घ्यावा असे मी आवाहन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, संगणकीय युगात माहितीचा विस्फोट झाला आहे. परकीय भाषेतील अनेक शब्द मराठी भाषेत प्रवेश करू लागले आहेत . परकीय भाषांमध्ये नवनवीन शब्दांची निर्मिती होत आहे . त्यामुळे सध्याचे शब्दकोश कालानुरूप सुधारित करणं महत्वाचे आहे . इतर भाषांमध्ये होतं ते काम वेगाने घडत आहे . आपणही से करावयास हवे. बहुजनांच्या भाषेला बोलीभाषेला साहित्यात व मराठी कोशात अधिकाधिक स्थान द्यावयास हवे. प्रारंभी समाजसुधारकांच्या लिखाणाला शब्दांना कोशकार स्थान देत नसत . ज्ञानकोशकार केतकरांवर देखील तशी टिपणी झाली होती . ज्योतीराव फुलेंच्या साहित्यातील शब्दांना कोशकारांनी दूर ठेवले होते . परंतु बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात . भाषा पांडित्यप्रचूर, क्लिष्ट न राहता सोपी , ओघवती होते. आपण पाहातो की , संगणक अथवा इंटरनेटच्या जमान्यात कॅची वर्ड संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल . दर दहा मैलाला भाषा बदलते असे म्हणतात . थोडक्यात प्रत्येक भागाची एक वेगळी भाषाशैली आहे . मला वाटते की , आपण आपल्या प्रमाण भाषेबद्दलचा दुराग्रह सोडून ह्या सर्व इतर शैलींना शब्दांना स्थान द्यावे. मराठी भाषा स्थानीक बोलीभाषांच्या बाबतीत समावेशक झाली तरच ती अधिक समृद्ध होईल असे माझे ठाम मत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाठ्यपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणता येईल का ? याकडे लक्ष देणे व आधुनिकता आणण्यासाठी सातत्याने काम करणे अत्यावश्यक आहे . नाहीतर माहितीच्या वेगवान जगात मराठी खूप मागे पडेल . तसेच पदवी – पदव्युत्तर लिखाणात मराठी भाषा कमी होत चालली आहे . यशवंतराव चव्हाणांना मराठी भाषेची वैज्ञानिक प्रांतात वृद्धी व्हावी अशी कळकळ होती . दहावी पर्यंत विज्ञानात मराठी भाषा आहे . परंतू पदवी व नंतरच्या अध्यापनात मराठी दिसत नाही . मराठी भाषेची पिछेहाट होण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे . महाविद्यालयीन शिक्षणासाठी इंग्रजी भाषा महत्वाची ह्या समजामुळे शालेय शिक्षणासाठी सुद्धा मराठी पेक्षा इंग्रजी भाषेला पसंती दिली जाते हा धोका मार मोठा आहे . संख्येअभावी मराठी शाळा बंद होण्याइतपत गंभीर परिस्थिती आज निर्माण होताना दिसते आहे . त्यामुळे पदवी व नंतरचे विज्ञान , वाणिज्य व इतर शिक्षण मराठीतून देण्याचा विचार व्हावा असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी त्यांनी आपल्या काव्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्याग्रह मांडला आहे. सावरकर हे विज्ञानवादी होते. सावरकरांच्या नावाला कोणी नाशिककर व महाराष्ट्रातील नागरिक करू शकत नाही. मात्र काही लोक त्यावर वाद निर्माण करतात याची खंत आहे. कुसुमाग्रजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साहित्य संमेलनाला त्यांचे नाव दिले हे स्वागतार्ह आहे. मराठी साहित्य संमेलनात त्यांचे मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. मराठी भाषेच्या विकासासाठी त्यात्यासाहेब यांनी अविरत प्रयत्न केले असल्याचे सांगत साहित्य संमेलन म्हटले की वाद निर्माण करणं ही परंपरा पडत आहे काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी. साहित्य संमेलन म्हटल्यानंतर अनेक उत्तम साहित्यिकांचं योगदान समजतं. त्यांना समजून घेण्याची संधी मिळते. मात्र अलिकडे साहित्य संमेलन म्हटलं की काही ना काही वाद झालाच पाहिजे असा काही नियम झाला आहे का? पण हे सातत्याने घडतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्याविषयीचं योगदान यासंदर्भातली चर्चाच होऊ शकत नाही. त्यांनी केलेला त्याग यासंबंधीची चर्चाच आपण करू शकत नाही. स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनी मांडलेले विचार, त्यांनी केलेलं लिखाण हे अजरामर आहे. मराठी भाषा ते लिखाण कधीही विसरू शकत नाही. कुसुमाग्रजांचं योगदानही मोठं आहे. तरी वाद कशासाठी?

माझ्या वाचनात जे जुने साहित्यिक आहेत आणि त्यांचं लिखाण ज्यावेळी मी आठवतो त्यावेळी मला सावरकर आठवतात. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते, ते नाही त्या गोष्टींचा पुरस्कार कधीही करत नव्हते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची काही वादग्रस्त विधानं आहेत पण त्यामध्ये विज्ञानावर आधारीत त्यांचा दृष्टीकोन होता. अगदी साधी गोष्ट सांगता येईल की त्यांनी हे सांगितलं होतं की गाय हा उपयुक्त पशू आहे. जोपर्यंत ती उपयुक्त आहे तोपर्यंत तिचा त्या पद्धतीने लाभ घ्या आणि उपयुक्तता संपल्यानंतर दुसऱ्या पद्धतीने लाभ घ्या. हे कुणी सांगितलं तर वीर सावरकरांनी.

अनेक गोष्टी सांगता येतील. वीर सावरकारांनी नंतरच्या काळात रत्नागिरीत जाऊन आपलं निवासस्थान त्या ठिकाणी बांधलं. पूजेसाठी त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं. त्या मंदिरात जो पूजा करत होता ती व्यक्ती दलित होती. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वीर सावरकर हे विज्ञानवादी होते. त्यांच्या नावाला विरोध करण्याचं काम नाशिककर कधी करूच शकत नाहीत. मराठी माणूस कधीही करू शकत नाही. त्यावरून जो वाद झाला ती काही चांगली गोष्ट नव्हती.

You May Also Like