मराठवाडा मित्रमंडळची विद्यार्थी साहाय्यक समितीला दोन कोटींची मदत

पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थी साहाय्यक समिती मोलाचे आणि उच्च दर्जाचे काम करीत आहे. शिक्षणामुळेच समाजात चांगले बदल होणार आहेत. मराठवाड्यातील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना समितीच्या सुविधा लाभाव्यात म्हणून मराठवाडा मित्रमंडळ संस्थेने समितीला दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गणगे यांनी सांगितले.

समितीच्या लजपतराय भवन वसतिगृहातील एका मजल्याला मराठवाडा मित्रमंडळ कक्ष असे नाव देण्यात आले. यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. तसेच एक कोटी रुपयांचा धनादेश समितीकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे सरचिटणीस किशोर मुंगळे, संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य बी. व्ही. देशमुख, डॉ. व्ही. एस. पाटील, संजय गर्गे, अण्णासाहेब पवार, प्राचार्य डी. एस. भंडारी, जितेंद्र पवार, तेज निवळीकर, रजिस्ट्रार सुभाष कदम व इतर सदस्य आणि समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त संजय अमृते, रत्नाकर मते, सुप्रिया केळवकर, तुषार रंजनकर, जिभाऊ शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, कार्यकर्ते, पर्यवेक्षक आदि उपस्थित होते.

संस्था शक्यतो एकत्र काम करत नाहीत, परंतु मराठवाडा मित्रमंडळ आणि विद्यार्थी साहाय्यक समिती यांचे कार्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उत्थानाचे असल्याने आणि दोघांचाही हेतू शुद्ध असल्यामुळे आपण एकत्र येत आहोत, असे संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले.

समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे यांना फ्रान्समध्ये शिक्षण घेताना ज्या आर्थिक अडचणी जाणवल्या आणि तेथील समाजाने त्यांना मदत केली त्या जाणिवेतून त्यांनी पुण्यात समितीचे काम सुरू केले. समितीमुळे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे. अजूनही या कामाची मोठी गरज आहे. ग्रामीण भागातील गरजू मुलींसाठी समिती नव्याने वसतिगृह बांधत आहे. दानशूर दाते, निस्पृह कार्यकर्ते आणि कृतज्ञतेच्या जाणिवेतून संस्थेशी जोडलेले माजी विद्यार्थी या सर्वांच्या प्रयत्नातून हे काम पुढे जात आहे, असे समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी सांगितले.