ये कैसी तलब! भर मैदानात सिगरेट मागू लागला ऑसी क्रिकेटर, पुढे काय झालं एकदा पाहाच

यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvsSA) यांच्यात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू (Test Series) आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत आहे. यावेळी एक नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज मार्नस लाब्युशेनला (Marnus Labuschagne) अचानक सिगारेट लायटरची गरज भासली. खरं तर, जगातील नंबर 1 कसोटी फलंदाज जेव्हा क्रिजवर पोहोचला आणि सिगारेटचे (Cigarette) हावभाव करू लागला, तेव्हा एमसीजीचे चाहते थक्क झाले. कोणालाच काही समजले नाही.

सिगारेट लायटरसह केला जुगाड
काही वेळात ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममधील अतिरिक्त खेळाडू सिगारेट लायटर घेऊन मैदानावर पोहोचले. लाब्युशेन आता लाइटरसह काय करतो? याकडे सर्वांचे लक्ष होते. खरे तर लाब्युशेनला त्याचे हेल्मेट खूप त्रास देत होते. हेल्मेटमधील दोषामुळे त्याला चेंडू पाहण्यात काही अडचण येत होती, त्यानंतर त्याने लायटरच्या सहाय्याने खाली असलेले नायलॉनचे कापड जाळून हेल्मेटला दुरुस्त केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने २ बाद १४७ धावा केल्या. लाब्युशेन ७९ धावांवर बाद झाला. तर सलामीवीर उस्मान ख्वाजा ५४ धावांवर खेळत आहे. त्याच्या सोबतीला स्टिव्ह स्मिथ शून्य धावेवर खेळत आहे.