शाहू साखर कारखाना आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेस आजपासून होणार प्रारंभ

कागल – येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेस सोमवारी (ता.४)प्रारंभ होणार आहे. कुस्तीचे माहेरघर व कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संगणकीय गुण फलकासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ही स्पर्धा होत आहे. कुस्तीतील वादग्रस्त क्षणाच्या वेळी रिप्ले सिस्टिमचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे पारदर्शकपुणे कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत. हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण राहणार आहे.

दुपारी एक वाजता कारखाना मालकीच्या गोडावून क्रमांक चार मध्ये चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. चार ते सहा ऑक्टोबर या दरम्यान स्पर्धेचे आयोजन केले आहे.

संगणकीय गुणफलकामुळे मल्ल, वस्ताद यांच्यासह कुस्ती पाहणार्‍या शौकिनांना ही कुस्ती नेमक्या कोणत्या अवस्थेत आहे. याबाबत अचूक माहिती मिळणार आहे. शिवाय मातीतील कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्थानिक पातळीवरील मल्लांना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना याचा भविष्यात फायदा होणार आहे.पुण्याच्या महाखेल स्पोर्ट्स मार्फत ही कार्यप्रणाली राबविण्यात आली आहे.

कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे पहिल्यांदाच विना प्रेक्षक होत असलेल्या स्पर्धेचा कुस्ती शौकीनांना घर बसल्या आनंद घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. फेसबूक यूट्यूब चैनल व इंस्टाग्रामवर वर या कुस्त्या पाहता येणार आहेत. दररोजच्या प्रक्षेपणाची लिंक पाठवली जाणार आहे. अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करून या स्पर्धा होत आहेत. कारखान्याच्या मालकीच्या बंदिस्त गोदामात या स्पर्धा घेण्यात येतील. त्या ठिकाणी मोजक्याच लोकांना प्रवेश असेल. यामध्ये मल्ल ,पंच, वस्ताद व अनुषंगिक स्टाफ यांचा समावेश असेल. गेल्या दोन वर्षापासूनच्या कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये बंद असलेल्या कुस्ती स्पर्धांमुळे मल्लांची गैरसोय होत आहे. या स्पर्धेमुळे इतरांनाही कुस्ती स्पर्धा घेण्यास प्रोत्साहन मिळावे व मल्लांची सोय व्हावी यासाठी शाहूच्या प्रशासनामार्फत हा प्रयोग राबविण्यात आला आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मल्लांना कोरोना चाचणी अहवाल व पालकांची लेखी संमतीही आवश्यक राहील. सकाळी आठ वाजता वजन नोंदणीस सुरुवात होणार आहे या कुस्ती स्पर्धा ३१ विविध गटांमध्ये होणार आहेत. त्यामध्ये १४ वर्षाखालील बाल व १६ वर्षाखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी आठ गट तसेच १९ वर्षाखालील ज्युनियर सात व सीनियर पाच वजनी गटामध्ये या स्पर्धा होतील. तसेच महिला कुस्तीगिरांसाठी 45.55 व 65 किलो अशा तीन वजनी गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येतील.