हिंदू जनआक्रोश रॅलीप्रकरणी मौलाना आझाद विचार मंचची पोलिस आयुक्तांशी भेट

मुंबई – हिंदू जन आक्रोश रॅली म्हणून सकल हिंदू संघटनेतर्फे रविवारी २९ जानेवारीला दादर ते कामगार मैदान मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातून राज्यातील सामाजिक सलोखा व शांतता बिघडवण्याचे काम करण्यात आले पण समाजातील शांतता व सलोखा कोणालाही बिघडवू देणार नाही, असे आश्वासन मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले असल्याची माहिती माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिली आहे.

मौलाना आझाद विचार मंचाच्या शिष्टमंडळाने माजी खासदार हुसेन दलवाई (Former MP Hussain Dalwai) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar) यांना भेटले व तक्रार दाखल केली. या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते सलीम अलवारे, मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक सुफियान वणू व इरफान पटेल आदी उपस्थित होते.

यासंदर्भात हुसेन दलवाई म्हणाले की, या मोर्चात लव्ह जिहाद, धर्मांतराच्या विरोधात घोषणाबाजी करत मुस्लिम समाजाविरोधी अश्लाघ्य व द्वेष पसरवणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या. तेलंगानातील आमदार टी. राजासिंह यांनी अतिभडकवाऊ भाषण करत मुसलमानांचे गळे कापा असे आदेशही दिले. तसेच या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शिवप्रतिष्ठाणचे कार्यकर्तेही सामील झाले होते. बजरंग दल, सनातन धर्म इत्यादी संघटनाही होत्या. शिवप्रतिष्ठाण व सनातन धर्म या दोन संघटनावर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, पत्रकार कलबुर्गी यांच्या खुनाचे आरोप आहेत. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मुसलमान, दलित, ओबीसी, कुणबी इत्यादी सर्वधर्मीय व सर्व जातीच्या जनतेला एकत्र करून महाराष्ट्रात एक आदर्श असे राज्य निर्माण केले होते. अशा मोर्चामध्ये महाराजांचे नाव घेऊन त्यांची बदनामी केली गेली. या संघटनातर्फे महाराष्ट्रातील वेगळ्या २० ठिकाणी अशारितीचे कार्यक्रम झाले असल्याचे म्हटले जाते परंतु यासंबंधी महाराष्ट्र पोलीस व मुंबई पोलीस हात जोडून गप्प कसे? असा प्रश्न शिष्टमंडळातर्फे उपस्थित केला गेला. समाजात द्वेषाचे वितुष्टाचे वातावरण करून नजिकच्या काळात या संघटनांचे महाराष्ट्रात दंगे घडवण्याचे मनसुबे असल्याचे म्हटले जाते.

सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत तसेच आम्ही परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. कोणालाही समाजातील शांतता व सलोखा बिघडू दिला जाणार नाही असे आश्वासन मुंबई पोलीस आयुक्तांनी या शिष्टमंडळाला दिले. अशा तऱ्हेच्या घटनेचा अहवालही तयार करण्याचे आदेश दिलेले असून कुठल्याही समाजाने कसल्याही प्रकारच्या भीतीमध्ये राहू नये, पोलीस पूर्णपणे अशा प्रवृत्ती मोडून काढण्यात सज्ज आहे असे आश्वासनही दिले असल्याचे दलवाई म्हणाले.