मविआचा लोकसभेसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? पहा कुणाच्या वाट्याला किती जागा?

Loksabha Election : लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठका वारंवार होत असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाकडून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांच्यासह अनेक मोठे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार महाविकास आघाडीचा १६-१६-१६ जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. याबाबत कुणीही अधिकृत माहिती दिली नसली तरी याच फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचे बोलले जात आहे. भाजपला रोखण्यासाठी एकत्रितपणे लढणे हाच एकमेव पर्याय असून हा फॉर्म्युला म्हणजे रामबाण इलाज असल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेते खाजगीत करत आहेत.