बाप नंबरी बेटा दस नंबरी, श्रीकांत शिंदे यांच्यावर मेहबूब शेख यांनी केली बोचरी टीका 

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आल्यापासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा वरपे यांच्याकडून करण्यात आला आहे.

खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर? असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या प्रकारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडकून टीका केलीय. महाराष्ट्राचं नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील, यासारख्या महारथींनी केलं. त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर मुख्यमंत्र्याचा पोरगा बसतो. म्हणजे हे असं झालं की बाप नंबरी बेटा दस नंबरी, अशी बोचरी टीका मेहबूब शेख यांनी केली.

मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून मुलानं काम करणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. उथळ पाण्याला खळखळाट अशी अवस्था श्रीकांत शिंदेची झाली आहे. म्हणजे मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे की, श्रीकांत शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे. एकनाथ शिंदे यांनी जी गद्दारी केली तो निर्णय पुत्र प्रेमापोटी केल्याचं आता समोर यायला लागला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय भविष्यासाठी एकनाथ शिंदे अस्थिर होते, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. कुठंतरी आज श्रीकांत शिंदेच्या देहबोली आणि वागण्यातून हे समोर येत आहे. असंही ते म्हणाले.