मेहबूबा मुफ्ती यांनी शिवलिंगाचा जलाभिषेक केल्याने नवा वाद! म्हणाल्या, “मला माझा धर्म…”

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या शिव मंदिरात अभिषेक करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मुस्लिम धर्मगुरूंनी याला इस्लामविरोधी म्हटले आहे. मुस्लिम असल्याने मुफ्तींनी हे करू नये, असे धार्मिक नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मेहबुबा मुफ्ती यांनी मुस्लिम धर्मगुरूंच्या वक्तव्यावर पलटवार करत मला माझा धर्म चांगला माहीत असल्याचं म्हटलं आहे.

मेहबूबा मुफ्ती जम्मूतील एका मंदिरात गेल्या होत्या. हे मंदिर त्यांच्या पक्षाचे दिवंगत नेते यशपाल शर्मा यांनी बांधले होते. यावेळी मंदिरात शिवलिंगाला जल अर्पण केल्याने मुफ्ती मेहबूबा यांच्यावर देवबंदी उलेमा मुफ्ती असद कासमी यांनी टीका केली होती. त्यांनी (मेहबूबा मुफ्ती) जे केले ते चुकीचे असल्याचे उलेमा यांनी म्हटले आहे.

असद कासमी यांची प्रतिक्रिया
असद कासमी म्हणाले होते की, कोणीही मग ती मेहबुबा मुफ्ती असो किंवा सामान्य मुस्लिम असो, असे कृत्य करू नये, ज्याला इस्लाममध्ये स्थान नाही. मुफ्तींनी जे केले, ते इस्लाममध्ये का चुकीचे आहे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र, भारतात प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे, असे ते म्हणाले. भारतात कोणताही माणूस काय करतोय, का करतोय, का करत नाहीये, तो स्वतःच्या इच्छेचा स्वामी आहे. पण मुफ्तींनी जे केले ते इस्लामच्या विरोधात आहे आणि ते योग्य नाही.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, मी सर्व धर्मांचा आदर करते
मेहबुबा मुफ्ती यांना देवबंदच्या उलेमांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, आम्ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत. आम्ही ‘गंगा जमुनी तहजीब’ पाळतो. मी सर्व धर्मांचा आदर करते.

मुफ्ती म्हणाल्या, काल मी आमचे नेते दिवंगत यशपाल शर्मा जी यांनी बांधलेल्या मंदिरात गेले होत्, ते एक सुंदर मंदिर आहे, मंदिरातील कोणीतरी प्रेमाने पाण्याने भरलेले भांडे त्यांच्या हातात दिले. मी त्यांच्या आपुलकीचा आणि भक्तीचा मान राखून शिवलिंगाचा जलाभिषेक केला. देवबंदचे मौलाना काय म्हणाले आहेत यावर मला भाष्य करायचे नाही. मला माझा धर्म चांगला माहीत आहे, मी कुठे जाते ही माझी वैयक्तिक बाब आहे.