‘या’ जिल्हयात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह मुसळधार पाऊस होण्याचे हवामान खात्याचे संकेत

लातूर – जिल्हयामध्ये दिनांक 3 ते 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे. या कालावधीत नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवून दर तासानी पडणाऱ्या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्याबाबत संदेश या कार्यालयास दयावा. व सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी, नागरिक यांनी खबरदारी घ्यावी.

विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 03 ते 07 या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठया जवळ, नदी जवळ जाऊ नये,आपल्या मुलांना जलसाठयाजवळ / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये,शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे.

पुलावरुन/ नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल/ नाला ओलांडण्याचा प्रयत्न करुन नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. पाऊस सुरु असताना विजेच्या तारा / जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते.तरी त्यापासून दुर राहण्याची खबरदारी घ्यावी. अशा सुचना आपल्या अधिनस्त पोलीस अधिकारी / तलाठी / मंडळ अधिकारी / ग्रामसेवक / सरपंच / कृषी सहाय्यक यांचे व्दारे निर्गमित करुन आपण आपल्या तालुक्यातील गावांना सावधगीरीची सूचना देवून योग्य ती उपाययोजना करावी. सदरच्या कालावधीत कोणीही आपले मुख्यालय सोडू नये असे जिल्हादंडाधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.