मायकल लोबो यांनी लुटीतून पैसा कमावल्याचा आरोप; कॉंग्रेसने केला भाजपचा निषेध

पणजी : मागील भाजपच्या ( BJP ) राजवटीत मायकल लोबो ( Michael Lobo ) यांनी लुटीतून पैसा कमावला या भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Sheth Tanavade ) यांच्या विधानाचा निषेध करत काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर ( Amarnath Panajikar ) यांनी रविवारी म्हटले की काँग्रेसच्या नेत्यांविरोधात बोलण्यापेक्षा तानावडे यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत का मिळत नाही हे सांगायला हवे. तसेच मंत्र्यांना खात्यांचे वाटप होण्यास उशीर का झाला असा प्रश्न त्यांनी केला आहे.

मागील भाजप सरकारच्या काळात मंत्री असलेले मायकल लोबो यांनी लुटीतून पैसे केले आणि त्यांच्याकडे पैसे असल्याने लोबो यांना विरोधी पक्षनेतेपद बहाल केल्याचा आरोप तानावडे यांनी केला होता.तानावडे यांच्या आरोपांचा मी निषेध करतो. मागील भाजप सरकारमधील मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आणि पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होईल, असे त्यांना म्हणायचे आहे का? जर होय तर त्यांनी ते गोव्यातील जनतेला सांगावे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या असंवेदनशील सरकारच्या प्रत्येक कारभारावर काँग्रेस लक्ष ठेवेल. असे कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष पणजीकर म्हणाले.

मंत्री लूटमार करत होते हे माहीत होते तर तानावडे तेव्हा गप्प का बसले, असा सवाल त्यांनी केला आहे. अशी लूट पुन्हा होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि लोकांना तशी खात्री दिली पाहिजे. असे पणजीकर म्हणाले.लोबो यांच्याकडे जो पैसा आहे तो त्यांनी आपल्या व्यवसायातून कमावलेला आहे आणि त्याचा करही ते सरकारला भरतात असे पणजीकर यांनी स्पष्ट केले.काँग्रेसचे पदाधिकारी आणि विरोधी पक्षनेते कोण होणार याबाबत बोलण्याचा अधिकार तानावडे यांना कोणी दिला, असा सवाल पणजीकर यांनी केला.

भाजप सरकारने राज्याची लूट चालवली आहे हे आम्ही गोव्यातील जनतेला सातत्याने सांगत होतो. आता गोव्यातील लोकांना हे लक्षात आले असेल की ते एका पक्षाला एकगठ्ठा मते देण्यात आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात अपयशी ठरले.असे पणजीकर म्हणाले.ते म्हणाले की, गोव्यातील 67 टक्के लोकांनी भाजपला नाकारले आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्याने अधिक अहंकारी झाला आहे आणि म्हणून शपथ घेण्यासाठी आणि मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यास वेळ लागला.असे पणजीकर म्हणाले.

खाते वाटप प्रक्रियेस विलंब झाला कारण प्रत्येकजण अशा विभागांसाठी लॉबिंग करत होते जिथे ते लुटून अधिक कमाई करू शकतात. निवडक खाते मिळवण्यासाठी मंत्री भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आमिष देत असल्याचे दिसते.असे पणजीकर म्हणाले.गोव्यातील जनतेचे प्रश्न मांडण्यात तानवडे अपयशी ठरले आहेत. शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळत नाही. पण तरीही भाजप आपल्या राजकारणात व्यस्त आहे, असे ते पुढे म्हणाले.