‘संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील असं मला वाटलं होतं’

नाशिक – नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले.

रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.  गिरीश कुबेर यांनी गोल्फकार्ट मधून संमेलन स्थळ पाहणी केली, असा काहीतरी प्रकार घडेल अशी सकाळपासून कुणकुण होती, असंही भुजबळ म्हणालेत.

संभाजी ब्रिगेडशी काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी आहे. याचाही अंदाज होता. मी आणि माझा मुलगा पंकज भुजबळ स्वतः त्यांना घेऊन फिरलो, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली आहे. संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील असं मला वाटलं होतं. असं भुजबळ म्हणालेत. पुण्यातून 2 जण मोटरसायकलवर आले होते, त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झालं त्यावेली हा प्रकार घडल्याचं भुजबळांनी सांगितलंय. पंकज भुजबळ यानी अडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांनी काळी पावडर फेकली अशी माहिती भुजबळांनी दिली आहे.

दरम्यान, ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह लिखाण असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी केला. ‘संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केली, असा उल्लेख पुस्तकात आहे. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज आमच्या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. आम्हाला याचा जराही पश्चाताप वाटत नाही,’ असं रोटे पाटील म्हणाले.