योद्धा म्हटलं की आम्हाला अजितदादा दिसतात – धनंजय मुंडे

मुंबई : राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू आणि ‘भारत श्री’ हा किताब मिळविणारे राज्याचे पहिले विजेते शरीरसौष्ठवपटू विजू पेणकर यांचे ‘योद्धा’ खेळचरित्र हे संघर्षातून निर्माण झालेल्या व्यक्तीमत्त्वाचा गौरव असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

‘भारत श्री’ विजू पेणकर यांच्या ‘योद्धा’ या खेळचरित्राचे प्रकाशन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा माझगाव येथील सर एली कदुरी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार रविंद्र वायकर, आमदार शशिकांत शिंदे, ज्यूईश फेडरेशनचे जॅानथन सॅालोमन, व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, डेवीड तळेगावकर, प्रकाशक प्रज्ञा जांभेकर-चव्हाण आदी उपस्थित होते. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण लिखित हे पुस्तक सदामंगल पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.

‘योद्धा म्हटलं की आम्हाला अजितदादा दिसतात, त्यांनी मला या कार्यक्रमाला जाण्यास सांगितले याचा मनस्वी आनंद आहे. श्री. पेणकर असो की संदीप चव्हाण हे संघर्षातून निर्माण झालेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. योद्धा पुस्तकास व श्री. विजू पेणकर यांच्या पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा. ‘अस धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

तर, राज्यातील पहिले भारतश्री, शरीरसौष्ठव आणि गरीब परिस्थितीतून संघर्षातून निर्माण झालेल्या व्यक्तीमत्वाचा गौरव ही आनंदाची बाब आहे. कबड्डीच्या मैदानात आणि चित्रपटाच्या पडद्यावर नाव कमाविणारे विजू पेणकर यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा’ हे खेळचरित्र पुस्तकरुपात आले आहे. हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. या खेळचरित्रातून नवीन ताकद निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन क्रीडापटूंच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

You May Also Like