‘देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग देश सोडून पळाले, अशांवर केंद्रीय एजन्सीने का विश्वास ठेवावा’ 

नाशिक : भुजबळसाहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजपसरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीरसिंग देश सोडून पळून गेले आहेत त्यांच्या आरोपावर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होते आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. भुजबळसाहेबांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहतेय. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.