‘…तर मुख्यमंत्र्यांना कन्याकुमारीतील तिन्ही समुद्रात फेकू’, रामदास आठवलेंचा इशारा

मुंबई : भाजपा सरकारला हटवून बंगालच्या उपसागरात फेकून देण्याची गरज आहे, असं वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलं होतं. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना निराशा व्यक्त करत त्यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरदृष्टी नसलेले देखील म्हटलं. देशात नेतृत्व बदलाची गरज असल्याचे सांगत या विषयावर लवकरच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. दरम्यान, राव यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी असं वक्तव्य करणं योग्य नाही. जर ते भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देऊ असं म्हणत असतील तर, आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीमधील तिन्ही समुद्रात फेकून देऊ,” असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपावर टीका करतना तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले होते की, “देशात नेतृत्व बदलाची गरज आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. या देशाला नेमकी कशाची गरज आहे, यावर आम्ही विचार करू आणि कामाला सुरुवात करू. आपला देश मजबूत आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. जिथे गरज असते, तिथे आपला देश प्रतिक्रिया देतो. भारतात बदलाची गरज आहे, क्रांतीची गरज आहे. जोपर्यंत आपण लढत नाही तोपर्यंत आपल्या देशात बदल होणार नाही,” असे ते म्हणाले.