या देशातील लोकशाही आणि संविधान भाजप मानते का हा खरा प्रश्न आहे – सतेज पाटील

कोल्हापूर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrkant patil) यांनी भाजप हा काही १९५१ मध्ये स्थापन झालेला पक्ष नाही त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे असं म्हटलं. पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी हिंदुत्त्वाचा संदर्भ देत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुण्यात एका ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी कार्यक्रमात बोलताना चंद्रकात पाटील यांनी हा दावा केलाय.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची गृहराज्यमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी खिल्ली उडवली आहे आहे. भाजप आधी संविधान मानते का?, याचे उत्तर द्यावे. काल-परवा स्थापन झालेल्या पक्षाला ऐतिहासिक परंपरेशी जोडून इतिहासाची बदनामी करू नये, असे परखड मत व्यक्त करत सतेज पाटलांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले (minister Satej Patil On Chandrakant Patil ) आहे.

सतेज पाटील म्हणाले की, जनसंघाची आणि भाजपची स्थापना कधी झाली हे अवघ्या जगाला माहित आहे. तरीही वैभवशाली भारतीय परंपरेशी आणि इतिहासाची आपले नाते जोडू पाहणाऱ्या भाजपने भारतीय इतिहासाची प्रतिमा मलिन करू नये. धार्मिक ध्रुवीकरण याचा प्रयत्न कितीही भाजपने केला तरी तो यशस्वी होणार नाही. या देशातील लोकशाही आणि संविधान भाजप मानते का हा खरा प्रश्न आहे, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.