मुख्यमंत्र्यांवर टीका कराल, तर नागडं केल्याशिवाय राहणार नाही; मंत्री सावंत यांचा इशारा

बीड – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी खालच्या पातळीवर विरोधकांवर टीका केली आहे. बीड दौऱ्यावर असताना त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या या ‘निष्ठा यात्रे’ला प्रत्यु्त्तर देण्यासाठी सुरु केलेल्या शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेसाठी तानाजी सावंत हे बीडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली.

तानाजी सावंत यांनी म्हटले की, माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही असे खळबळजनक वक्तव्य सावंत यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यावर टीका करण्याअगोदर तुमचे चारित्र्य तपासा अशी अप्रत्यक्ष टीका सावंत यांनी विरोधकांना लगावला आहे.

आज खऱ्या अर्थाने सगळ्या शिवसैनिकांना कळलं की यांची बौद्धिक क्षमता काय आहे. गेले 20 तीस वर्ष आपला सर्व संसार मो़डून शिवसेनेसाठी झटलो. मी अशा माणसाच्या हाताखाली काम करीत होतो, त्याला फक्त शिवसैनिकांचे कष्टच सोसायचं माहित होतं. त्याला काही देण्याचं माहिती नव्हतं. फक्त येना बॅंक होती, त्याला काही देना बॅक माहितीच नव्हती. त्यांनी आमच्यावर 50 खोक्कांचा आरोप लावला. परंतु 50 खोक्यांचा काय अर्थ होतो आणि याची व्याख्या ही फक्त मुख्यमंत्री आणि तानाजी सावंतलाच माहिती आहे.

उद्धव ठाकरे आम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण, तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता, शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा थेट सवाल सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली. अशी जहरी टीका सावंत यांनी बोलताना केली आहे.