मराठवाडा अस्मानी संकटात असताना ठाकरे सरकार घरात, विरोधी पक्ष नेता शेतकर्‍यांच्या दारात, पालकमंत्री बेपत्ता

मुंबई : अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना जबरदस्त पडला.सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीच्या नद्या झाल्या. खरीप पिकाचा चिखल झाला. 7000 हेक्टर जमिन खरडुन गेली तर एकुण 38 लाख हेक्टर शेतीवरील पिके नेस्तनाबुत झाली. 1100 मुकी जनावरे वाहुन गेली तर 25 पेक्षा अधिक लोकांचे बळी गेले. एकुणच मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत आणि दु:खमय असुन अस्मानी संकटाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. लोकांचे संसार उघड्यावर पडले. न भुतो न भविष्यति संकट असुन शेतकर्‍यांच्या डोळ्यातलं पाणी आता थांबु शकत नाही असं चित्र आहे. खरीपाचं 100 टक्के पीक गेलं. त्याहुन अधिक खरडुन गेलेल्या जमिनीमुळे आता जगावं कसं? असा प्रश्न लोकांना पडला. नैसर्गिक संकटात सामान्य जणांच्या नजरा माय-बाप सरकारच्या भुमिकेकडे असतात. पण एवढं संकट येवुनसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह विभागातील अनेक पालकमंत्री घरी बसुन आहेत तर दुसर्‍या बाजुने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे ही सारी मंडळी लोकांच्या संकटात धावुन येताना दोन दिवसापासुन मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नसुन पालन कर्तेच बेपत्ता असतील तर मग लोकांनी बघायचं कुणाकडे?हा सवाल आता जनता विचारत आहे. नुकसान पंचनाम्याला गती नाही, मदत काय मिळणार?हे माहित नाही. डोळ्यातले आश्रु पुसण्यासाठी विरोधी पक्षनेत्याचा पाय बांधावर पडला. गलितगात्र अवसानीत मानसिकतेला आधार मिळत असला तरी झोपीचं सोंग घेतलेल्या ठाकरे सरकारच्या विरोधात मात्र आम जनतेत संताप व्यक्त होत आहे.

सप्टेंबर महिना मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यासाठी कर्दनकाळच ठरला असं म्हणावे लागेल. एकुण पर्जन्यमानापैकी दिडपटीने पडलेला पाऊस ढगफुटीमुळे आलेला महापुर आणि त्याने घातलेला कहर दुसर्‍या बाजुने सतत पडत असलेला मुसळधार पाऊस एकुणच काय अस्मानी नैसर्गिक संकट ज्याचा फटका शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला जबरदस्त बसला.मांजरा, जायकवाडी, माजलगाव आदी मोठ्या प्रकल्पासह छोटी-मोठी मराठवाड्यातली सर्व धरणे भरली ज्यामुळे नदीकाठच्या लोकांना धोका निर्माण झाला. मांजरा पट्यात ढगफुटी झाल्यानंतर मागच्या आठवड्यात लातुर आणि बीड जिल्ह्यातील काही गावांना त्याचा फटका जबरदस्त बसला. धरणातुन पाणी सोडल्यामुळे महापुर आले. ज्यामुळे नदीकाठच्या जमिनी खरडुन गेल्या. शेतीच्या नद्या झाल्या. जिथे 25 फुट काळीची जमिन तिथे दगडाचे ढिगारे पहायला मिळाले.

पठाणमांडवा ता.अंबाजोगाई सारख्या गावात 200 एकर जमिन वाहुन गेली ज्याची कल्पना न केले बरे. थोडं मागे पाहिलं तर सप्टेंबर चालु महिन्यात सतत मुसळधार पडल्यामुळे खरीपाचा दाणासुद्धा शेतकर्‍यांच्या पदरात पडत नाही. कापुस, सोयाबीन, मुग, उडीद, तुर ही पिके 100 टक्के गेली. शासकीय आणेवारीचे आकडे 40 ते 45 टक्यापेक्षा वरी जावु शकत नाहीत. दुसर्‍या बाजुने महापुराचा फटका जनावरे वाहुन गेली. जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झाली. चांगली घरं, कोठे, वस्त्या पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले. एवढा प्रलयंकार कधीच घडला नाही. मांजरा पाणी सोडल्यानंतर आपेगाव, देवळा, सारसा, तांदुळजा, सावळेश्वर पैठण या परिसरात प्रचंड नुकसान शेतकर्‍यांचे झाले आहे. खरं तर नैसर्गिक संकटात सामान्य जनतेच्या नजरा सरकारच्या भुमिकेकडे असतात. ओला दुष्काळ जाहिर करावा अशी परिस्थिती आहे. कारण काहीच शिल्लक शेतकर्‍यांचं राहिलं नाही. उद्धवस्त झाला. पण निगरगट्ट सरकार मराठवाड्याकडे बघायला तयारच नाही.

सरकारचे काही मंत्री येवुन गेले. पण राजकिय सहल करत हार तुरे घेत निघुन गेले. शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम त्यांनी केलं. दुसर्‍या बाजुने उस्मानाबाद पालकमंत्री शंकरराव गडाख, परभणी पालकमंत्री नवाब मलिक, औरंगाबाद पालकमंत्री सुभाष देसाई ही मंडळी मुंबईबाहेर पडलेली नसुन एसीत बसुन त्यांना विभागातलं दु:ख कळणारच नाही. खरं तर जिल्ह्यातील नैसर्गिक संकटात पालकमंत्र्यांची भुमिका महत्वाची असते. पण हे पालकमंत्री कुठे बेपत्ता झाले? हे कळायला मार्ग नाही. स्वत: मुख्यमंत्री मागच्या महिन्यात मराठवाड्यात येवुन गेले. त्यांनीही शेतकर्‍यांना भेट दिली नाही. अशा संकटाच्या पार्श्वभुमीवर ठाकरे सरकार आणि त्यांचे मंत्री घरात बसले असताना दुसरीकडे मात्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, केंद्रिय रेल्वेमंत्री रावसाहेब दादा दानवे शिवाय आमदार, खासदार शेतकर्‍यांच्या बांधावर जावुन भिडले आहेत. चार दिवसापुर्वी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी देखील शेतकर्‍यांच्या बांधावर जावुन पडत्या पावसात नुकसानग्रस्त भागात भेट देवुन पाहणी केली. पण सत्ताधारी मंत्री,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठेच दिसत नाहीत. हेच दुर्दैव म्हणावे लागेल.

पाऊस थांबला महापुर ओसरला. पण संकट डोळ्यासमोरून जाता जाईना. शेतीच्या नद्या झाल्याने प्रत्यक्ष डोळ्याने चित्र शेतकर्‍यांना पाहवतच नाही. रोज बिचारा डोळ्यातलं पाणी आठवत झोपही येईना आणि घासही जाईना अशा संकटात सापडला आहे.मुर्दांड माय-बाप सरकार बघायला सुद्धा तयार नाही.देवेंद्र फडणवीसांनी हिंगोली, नांदेड, लातुर, उस्मानाबाद आदी जिल्ह्याच्या दौर्‍यावर जावुन शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातले आश्रु पुसण्याचे काम केले.नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना करताना शेतकर्‍यांना विमा मिळाला पाहिजे यासाठी कृषी अधिकार्‍यांनाही त्यांनी धारेवर धरलं.

संकटात सापडलेल्या लोकांना त्यांच्या भेटीनंतर आपल्या पाठीशी कुणीतरी आहे हा आधार मिळाला. फडणवीसांनी जिथे जिथे नुकसान झालं, ज्यांचे संसार धुवुन गेले अशांचं दु:ख जाणुन घेतलं. शेतकर्‍यांना तात्काळ 50,000 रूपये हेक्टर मदत देण्याची मागणी केली आहे. विभागातील सर्व जिल्ह्यात संकटाची सारखी परिस्थिती आहे. वास्तविक पाहता निसर्गाचा एवढा प्रकोप पुर्वी कधी अनेक वर्ष झाला नसावा.

मोठे पाऊस पडले पण शेतीचं अशा प्रकारे नुकसान कधीच झालं नाही. राजकारण सामान्य जनतेच्या मुळावर कसं उठतं?हा अनुभव लोकांना येत आहे. जुलै-ऑगस्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुर, सांगली पट्यात अतिवृष्टी झाली. तात्काळ मदत तिथे सुरू झाली. 2015 ला तत्कालीन काळात देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळ्या निकषाखाली करोडो रूपायांचे अनुदान दिले. त्याच धर्तीवर मराठवाड्यातील शेतकर्‍यांना मदतीची अपेक्षा आहे. पण राज्यातील ठाकरे सरकार पश्चिम महाराष्ट्रातील पुढार्‍यांच्या इशार्‍यावर चालते आणि त्या पुढार्‍यांचा मराठवाड्यातील जनतेविषयी फार मोठा आकस आहे.

विभागाला काही द्यायंच म्हटलं की राजकिय चष्मा लावतात. मग माणसं भरडुन गेली तरी चालतं. राजकारण सामान्य जनतेच्या मुळावर कसं येतं?त्याचं उदाहरण म्हणजे सद्याचं चित्र. राजकारणात पलीकडे पाहुन विभागात संकटात सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेला पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर तात्काळ मदत चालु करण्याची मागणी आता सामान्य जनता करत आहे.

– राम कुलकर्णी, प्रवक्ता भाजप

हे हि पहा :