ब्रिजभूषण यांच्यावर रागातून लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची कबुली!

ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधातील महिला कुस्तीपटूंच्या आंदोलना बाबतीत गुरुवारी म्हणजेच ८ जून रोजी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या ७ महिला कुस्तीपटूंपैकी एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या वडिलांनी दावा केला आहे की ब्रिजभूषण यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली गेली होती. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी सांगितले की, कुस्ती संघटनेच्या अध्यक्षाचा सूड घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले.

काय म्हणणंय अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचं?
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर रागातून लैंगिक छळाचे खोटे आरोप केल्याचं मान्य केलं आहे. यासंदर्भात त्यांनी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेचा दाखला देण्यात आला असून त्यासंदर्भातली ऑडिओ क्लिपदेखील ट्वीट करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अंडर १७ एशियन चॅम्पियनशिप चाचणी मालिकेत लखनौमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात या अल्पवयीन कुस्तीपटूचा पराभव झाला होता. यासाठी ब्रिजभूषण सिंह जबाबदार असल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.

“या सामन्यासाठी रेफरी फेडरेशननं नियुक्त केला होता. फेडरेशनचे प्रमुख ब्रिजभूषण आहेत. मग आमचा कुणाविरोधात राग असेल? हा फक्त कुस्तीच्या एका सामन्याचा मुद्दा नाही. ती एका वर्षाची मेहनत होती”, असं त्यांनी म्हटलं आहे. “मला कुणीही मोर्चात सहभागी व्हायला सांगितलं नव्हतं. मी स्वत:हून गेलो. कुस्तीपटूंचं आंदोलन होतं. त्यांच्यावर अन्याय झाला तसा माझ्यावरही अन्याय झाला होता. म्हणून मी आंदोलनात सहभागी झालो होतो”, असंही ते म्हणाले.

“न्यायालयात सत्य समोर येण्यापेक्षा आत्ताच सत्य समोर येणं योग्य ठरेल. आता दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली आहे. सरकारनं माझ्या मुलीच्या पराभवाची न्याय्य चौकशी करण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे आपली चूक सुधारणं हे माझंही कर्तव्य आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.