Pune : भाजप आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, पुलावरून 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली फॉर्च्युनर

MLA Jaykumar Gore car accident : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gor) यांच्या गाडीला भीषण अपघात (car accident) झाला. पुणे-पंढरपूर रस्त्यावरील मलठण येथील स्मशानभूमीजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं त्यांची गाडी 30 फूट खोल खड्डयात पडली.

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या घटनेत आमदार जयकुमार गोरे किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीमधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर 2 दोघे किरकोळ जखमी आहेत.

गोरे यांच्यावर साताऱ्यातील रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना आता पुण्यातील रुबी रुग्णालयात आणण्यात आलं आहे. विशेष रुग्णवाहिकेतून त्यांना पुण्यात आणण्यात आलं असून त्यांना एमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या हाताला सलाईन होती. तोंडाला ऑक्सिजन लावलेला होता. तसेच हाताला आणि छातीला मार लागलेला दिसत होता. डॉक्टरांचा ताफाही त्यांच्यासोबत होता. त्यानंतर गोरे यांना स्ट्रेचरवरून रुबी रुग्णालयाच्या अतिदक्षता वॉर्डात दाखल करण्यात आलं. त्यांची तब्येत स्थिर आहे.