‘तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न करा पण हा भोसरीच्या मातीतील पहिलवान दाबला जाणार नाही’

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी वाढदिवसाचे निमित्त साधून संपूर्ण शहरात तुफान बॅनरबाजी केली होती. त्यानंतर मात्र, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शहरातील लांडगे यांचे फ्लेक्स काढून टाका, असे आदेश दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

महापालिका आगामी निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी भोसरीसह संपूर्ण शहरात ठिकठिकाणी विविध समाजपयोगी कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि उपक्रमांची ‘धडाका’ लावला होता. निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे भाजपाने जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून कार्यक्रमाची रेलचेल आणि फ्लेक्सचा धुरळा उडाला होता. राष्ट्रवादीनेच आमदार लांडगे यांचे फ्लेक्स काढण्याचे नियोजन प्रशासनाला हाताशी धरुन केले आहे अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.

या प्रकरणावर आता खुद्द महेश लांडगे यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना त्यांच्या चीतपरिचित अंदाजात धोबीपछाड दिला आहे. महेश लांडगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ‘हा भोसरीतील पहिलवान दबणारा नाहीये’. असा थेट इशारा दिलाय.

महेश लांडगे म्हणाले, ‘आयुक्तांनी फ्लेक्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी ते का दिले आहेत, कोणाच्या दबावात दिले आहेत ? ते जाउद्या मागच्या दोन वर्षापासून ते खूप दबावात आहेत. महापालिकेचे कर्मचारी आपलेच आहेत त्यांना मदत करून आपले फ्लेक्स काढून घ्या. आपल्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तरी हा भोसरीच्या मातीतील पहिलवान दाबला जाणार नाही.’ अशी हुंकार महेश लांडगे यांनी भरली आहे.

पहा व्हिडीओ