आमदार महेश लांडगेंचे शहरातील सर्व फ्लेक्स काढून टाकण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

पिंपरी – पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी वाढदिवसाचे निमित्त साधून संपूर्ण शहरात तुफान बॅनरबाजी केली आहे. मात्र, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शहरातील लांडगे यांचे फ्लेक्स काढून टाका, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महापालिका आगामी निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी भोसरीसह संपूर्ण शहरात ठिकठिकाणी विविध समाजपयोगी कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि उपक्रमांची ‘धडाका’ लावला आहे. निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे भाजपाने जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून कार्यक्रमाची रेलचेल आणि फ्लेक्सचा धुरळा उडाला आहे.

लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे वातावरण होवू लागल्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी ही बाब मुंबईपर्यंत पोहोचवल्याची चर्चा आहे.दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेले बँडिंग आणि भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पायाखालची वाळू सरकली आहे का असा सवाल देखील काही मंडळी उपस्थित करू लागले आहेत.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीनेच आमदार लांडगे यांचे फ्लेक्स काढण्याचे नियोजन प्रशासनाला हाताशी धरुन केले आहे अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका राष्ट्रवादी विरुद्धा भाजपा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.