एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची चांदी; औरंगाबादच्या वाट्याला तीन मंत्रिपदं ?

मुंबई – महाराष्ट्रात इतक्या दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्यात आले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला या सरकारमध्ये फडणवीस सहभागी न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते मात्र वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या ( Rebel MLA ) वाट्यालाही चांगली मंत्रिपदं येणार अशी चर्चा आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून शिंदेंसोबत पाच शिवसेना आमदार (Shivsena MLA) गेले असून त्यांचीही खाते वाटपात वर्णी लागणार अशी चर्चा आहे. यापैकी तिघांना मंत्रीपदं मिळणार तर उर्वरीत दोघांना राज्यमंत्री पद मिळणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 9 आमदारांपैकी 6 आमदार शिवसेनेचे आहेत. त्यापैकी पाच आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात गेले होते. यात पैठणचे आमदार संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, वैजापूरचे रमेश बोरनारे, औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट तर औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा समावेश आहे.

ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासोबत संजय शिरसाट यांनाही नव्या शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेनंतर औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र शिवसैनिकांमध्ये उफाळून आलेल्या बंडाळीमुळे भाजपचाच फायदा होईल असं सध्या दिसत आहे.