शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात हिंदुजननायक राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येणार?

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Eknath Shinde and party chief Uddhav Thackeray) यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत दसऱ्याच्या दिवशी नक्की शिवसेनेचा मेळावा होणार की एकनाथ शिंदे गटाचा याबाबत उलटसुलट चर्आचा सुरु आहे.

शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवरणकर यांनी हा अर्ज दाखल केला आहे. या अगोदर शिवसेनेकडून देखील अर्ज करण्यात आला होता त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.  शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मिळवण्यासाठीचे पत्र शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला पाठवले आहे. आता एकनाथ शिंदे गटानेही याच जागी दसरा मेळावा व्हावा, यासाठीचे परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले असल्याची माहिती आहे.

आता या वादात एक नवा ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा थेट आमने सामने आले आहेत. दसरा मेळावा ही शिवसेना स्थापनेपासून परंपरा आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला आव्हान देण्यासाठी शिंदे गटाची व्यूहरचना आखणी सुरू आहे.