भोंग्याच्या भूमिकेवरुन नाराज झालेल्या आणखी एका नेत्याचा मुस्लीम नेत्याचा राजीनामा

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते ठाण्यातील उत्तरसभेत बोलत होते. न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान,राज ठाकरे यांची ही भूमिका न पटल्याने आता कल्याणमधील मनसेचे प्रदेश सचिव इऱफान शेख यांनी गुरूवारी मनसेच्या सदस्यत्व आणि प्रदेश सचिव पदाचा राजीनामा दिला. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका शेख यांना मान्य नव्हती. तशी नाराजी त्यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त केली होती. दोन दिवसांपूर्वीच्या ठाणे येथील सभेत राज यांनी भोंगे हटविण्याची अंतिम मुदत दिल्याने या गुंत्यात अडकणे नको असा विचार करून शेख यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा मार्ग पत्करला.

पक्ष स्थापनेपासून काम करत आहे. पक्षनिष्ठेला बांधिल राहून दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व भेद विसरून पार पाडल्या. अनेक आंदोलनात अग्रभागी राहून नेतृत्व केले. पोलिसांनी हिरवे निळे होईपर्यंत मारले. आपण या जखमा विसरायच्या नाहीत, बाकी मी बघतो असे आपण म्हणाला होता. आता आम्ही काय बघत आहोत. समाजात कुचंबणा, पक्षात अस्थिर वातावरण. १६ वर्षानंतर आपणास अचानक अजान, मशिद, भोंगे, मदरसे यांची आठवण आली. आम्ही तुमच्या सोबत खंदे समर्थक म्हणून असताना तुम्ही आम्हाला याविषयी बोलला असता तर आम्ही याचा सोक्षमोक्ष केला असता, असे शेख यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.