बऱ्याच वर्षांनी का होईना कुंभकर्णाची झोप मोडली, मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.

ठाकरे सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेकडून पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. संदीप देशपांडे यांनी या प्रकरणावरुन सरकारला कुंभकर्णाची उपमा देत टोला लगावलाय. ‘बऱ्याच वर्षांनी का होईना कुंभकर्णाची झोप मोडली. याबद्दल कुंभकर्णाचे अभिनंदन,’ असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया दिलीय. तसेच, ‘निवडणुकीच्या तोंडावर निर्णय झाला याचा अर्थ शिवसेनेच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच त्यांना आता मराठी आठवली आहे,’ असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.