शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंनी दिले आमंत्रण

मुंबई: दिवाळी (Diwali) हा सण आजपासून (शुक्रवार, 21 ऑक्टोबर) सुरू होत आहे. भारतभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी समस्त दादरकर आणि मुंबईकरांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी मनसेच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क स्टेडियमवर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी हे पत्र आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट केले आहे.

शिवाजी पार्क दीपोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknah Shinde) आणि उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरवर्षी मनसेच्या वतीने दिवाळीच्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याचा शुभारंभ आज वसुबारसेपासून होणार आहे. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे दरवर्षी उपस्थित असतात. यंदा मात्र, त्यांच्यासमवेत दिग्गज नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे…

21 ऑक्टोबर, 2022

माझ्या शिवाजीपार्क शेजाऱ्यांनो

तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो,

दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष करोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय.

दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या 10 वर्षांपासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या 2 वर्षांत सुध्दा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे.

दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादर मधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.

वसुबारसेपासून, 21 ऑक्टोबर 2022 पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, 8 नोव्हेबंर 2022 पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे 21 ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.

आपल्या सर्वांचा, राज ठाकरे