राष्ट्रवादीचा मनसेला जबर धक्का, बडा नेता बांधणार हाती घड्याळ !

मुंबई : राज्यात राज ठाकरेंच्या मनसेला धक्क्यावर धक्के बसण्याचे सुरूच आहे. आधी पुण्यातील महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे त्यानंतर औरंगाबाद येथील पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा दिल्याने आधीच मनसेच्या अडचणी वाढल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला विदर्भात एक जबर धक्का दिला आहे.

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अतुल वांदिलेंसह मनसेचे चाळीस पदाधिकारी आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अतुल वांदिले हे मनसेचा विदर्भातील ओबीसी चेहरा आहेत. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. हा मनसेला विदर्भात मोठा धक्का मानला जातो.

अतुल वांदिले म्हणाले, मनसे पक्ष विदर्भात वाढला नाही ही खंत आहे. आमची नाराजी राज ठाकरे यांच्यावर नाही. तर नाराजी ही दुसऱ्या फळीतील नेत्यावर आहे. दुसऱ्या फळीतील नेते कधीच आमच्याकडे दौरे करत नाहीत. पक्षाचा कोणताही कार्यक्रम दिला जात नव्हता. मग अशा ठिकाणी थांबून उपयोग नाही, अशी कार्यकर्त्याची भावना होती. त्यामुळं राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचं वांदिले म्हणाले.