मनसे कार्यकर्त्यांकडून रुग्णालयात घुसून डॉक्टरला बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

MNS : रुग्णावर उपचार करण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे मागितल्याच्या रागातून मनसे कार्यकत्यांनी संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघर येथील बोईसर येथे ही घटना घडली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून डॉक्टरला मारहाण केल्याचा आरोप असून संपूर्ण प्रसंग रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे संपूर्ण घटना?
‘न्यूझ १८’ ने दिलेल्या वृत्तानुसार, मनसेचे पालघरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची तोडफोड करत एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वप्निल शिंदे असं या डॉक्टरचं नाव असून त्यांचं बोईसर परिसरात शिंदे रुग्णालय आहे.

कोरोना काळातील पेंडिंग असलेल बिल मागत असल्याने समीर मोरे यांनी ही बेदम मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरकडून करण्यात आला आहे. या मारहाणीत डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गुजरातमधील वापी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ रुग्णालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मारहाण आणि रुग्णालयाच्या तोडफोडी प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या बोईसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या मारहाणीनंतर बोईसर आणि परिसरातील डॉक्टर कडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. दरम्यान पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास रुग्णालयं बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाईल असा इशारा डॉक्टरांच्या संघटनांकडून देण्यात आला आहे .