युवकांना नोकर्‍या देण्यात मोदी सरकार अपयशी; तो एक चुनावी जुमला होता – राष्ट्रवादी

मुंबई – युवकांना १६ कोटी नोकऱ्या देण्याचा आकडा आता दहा लाखावर येऊन पोचला आहे याचा अर्थ मोदीसरकार अपयशी ठरले आहे तो फक्त चुनावी जुमला होता हे सिद्ध झाले असल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) पहिल्यांदा निवडून आल्यावर दरवर्षी दोन कोटी नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार ८ वर्षात १६ कोटी नोकऱ्या द्यायला हव्या होत्या असेही महेश तपासे म्हणाले. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आज महेश तपासे यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.

देशाच्या सर्व मोठ्या पदावर जेव्हा निवडणूका होतात त्यावेळी सर्व राजकीय पक्षांना शरद पवारसाहेब (Sharad Pawar) हे त्या पदावर असावेत असे वाटते. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत असून ही निवडणूक सर्व सहमतीने झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे कारण राष्ट्रपती हे कुठल्याही पक्षाचे नसतात ते संविधानाचे प्रमुख या नात्याने भारतीयांचे पालक असतात असेही महेश तपासे म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी दिल्लीत एक बैठक बोलावली आहे असून या बैठकीला विरोधी पक्षातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत शिवाय या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आदरणीय शरद पवारसाहेब देखील जाणार आहेत अशी माहितीही महेश तपासे यांनी दिली.