मोदी हे कधीच सूडाचं राजकारण करत नाहीत; फडणविसांचा दावा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या ११ सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. चा प्रकल्प असून त्यावरून वाद सुरू झाला आहे.

काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातून ही कारवाई करण्यात आली. मात्र, त्यातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ईडीनं थेट ही कारवाई केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, या सर्व प्रकरणाववरून भाजपवर महाविकास आघाडीकडून टीका होत आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुडाचे राजकारण होत असल्याची टीका होऊ लागली आहे. यानंतर आता पहिल्यांदाच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, मोदी हे कधीच सूडाचं राजकारण करत नाहीत. त्यांच्या राज्यात तरी कोणतीही सेंट्रल एजन्सी सूडाच्या भावनेने राजकारण करत नाही. पण दरेकरांवर कशी कारवाई सुरू आहे. नसलेल्या गोष्टी कशा तयार होत आहेत. आमच्या सर्वांविरोधात यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून कसे षडयंत्र करत आहेत या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्या या नेत्यांनी पाहाव्यात. पण मला असं वाटतं केंद्र सरकार असेल अथवा राज्य सरकार असेल, कुणीही चुकीची कारवाई करू नये. कारवाई योग्यच झाली पाहिजे. पुन्हा एकदा विश्वासाने सांगतो, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊच शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.