100 व्या वाढदिवसानिमित्त रस्त्याला PM मोदींच्या आईचे नाव देण्यात येणार

वडनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) त्यांच्या गुजरात दौऱ्यात अनेकदा त्यांच्या आईला भेटताना दिसतात. या महिन्याच्या 18 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी (Hiraben Modi) यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी त्यांची गांधीनगर येथील निवासस्थानी भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या आईचा 100 वा वाढदिवस खास बनविण्यासाठी गांधीनगरमधील रायसन पेट्रोल पंपापासून 60 मीटरच्या रस्त्याचे नाव ‘पूज्य हिरा मार्ग’ असे ठेवण्यात येणार आहे.

याबाबत गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना (Gandhinagar Mayor Hitesh Makwana) यांनी बुधवारी अधिकृत पत्रक जारी करून माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी या 100 वर्षांच्या होत आहेत आणि राज्याच्या राजधानीतील जनतेची मागणी आणि भावना लक्षात एका रस्त्याला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. रायसन पेट्रोल पंपावरील ६० मीटर लांबीच्या रस्त्याला ‘पूज्य हिरा मार्ग’ (Pujya Hira Marg) असे नाव देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

18 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरातील (Hatkeshwar Temple) पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पीएम मोदी आपल्या वडोदरा दौऱ्यात सुमारे ४ लाख लोकांना संबोधित करणार आहेत.