म्हापश्यातील मोदींची सभा ठरणार ‘गेमचेंजर’; भाजपला मिळणार बुस्टर

 पणजी – गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे धुरंधर नेते ठिकठिकाणी प्रचार बैठकांमधून मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 10 फेब्रुवारी रोजी गोव्यात येत आहेत.

गुरुवारी म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या समोरील जागेत ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान 11 तारखेला गोव्यात येणार असे कळविण्यात आले होते. मात्र, मोदी यांचा दौरा 10 रोजी ठरला आहे. गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता ते म्हापसा (Mapusa) येथे जाहीर सभेला संबोधित करतील.

दरम्यान, देशभरातील तरुणांवर सध्या मोदींची जादू चालताना पाहायला मिळत असल्याने या सभेमुळे युवकांची मते भाजपकडे वळू शकतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच भाजप सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग,व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याने मोदींच्या सभेमुळे उद्योजक,छोटे-मोठे व्यापारी यांचा देखील भाजपला पाठींबा मिळू शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

याशिवाय गोव्यातील पर्यटन, गोव्यातील विकास, तसेच सर्वसामान्य गोवेकरांबाबत मोदी नेमके कोणते विचार मांडणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. यामुळेच ही सभा गोवा भाजपसाठी बुस्टर डोस प्रमाणे काम करणार आहे.