राज्यात मोघलाई ? : शिवरायांचा पुतळा अंधारात हटवला; भाजपने केला तीव्र निषेध व्यक्त

अमरावती – छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर अमरावतीकर जनतेने बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावून आणि सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांवर  दबाव टाकून जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी हटवण्याच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी अमरावतीतील शिवप्रेमी तरुणांनी राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. त्यानंतर सलग चार दिवस शहरातील शेकडो लोक दररोज सायंकाळी शिवछत्रपतींची महापूजा व महाआरती करीत होते. हजारो तरुण सेल्फी काढून आपले शिवप्रेम व आनंद दर्शवत होते. मात्र, तालिबानी वृत्तीच्या महाविकास आघाडी सरकारच्या पालकमंत्री ऍड. यशोमतीताई ठाकूर यांनी सर्व संबंधित शासकीय  अधिकाऱ्यांवर व पोलीस प्रशासनावर दबाव टाकत आज छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी रातोरात हा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य केले आहे.

12 नोव्हेंबरला अमरावती शहरात राजरोसपणे हिंसाचार घडविणाऱ्या व नंगा नाच घालणाऱ्या रझा अकादमीच्या विरोधात चकार शब्द न काढणाऱ्या व त्यांना खुली सूट देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा रातोरात पुतळा काढणे याचाच अर्थ राज्यात मोघलाई अवतरली असल्याची टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवभक्त लोकांचा आणि अमरावतीकरांचा अपमान केला म्हणून शिवराय कुळकर्णी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.