सिराज आणि उमरान ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा होतोय आरोप; पाहा नेमकं प्रकरण काय

नागपूर| न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात (IND vs AUS) कसोटी मालिका खेळायची आहे. ९ फेब्रुवारीपासून या ४ सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला (Border Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू ५ दिवस आधीच तयारीसाठी नागपूरला पोहोचले आहेत. नागपूर येथील संघाच्या हॉेटेलमध्ये प्रवेश करतानाचा भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडिओ चर्चेत येण्यामागचे कारण वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक हे आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, हॉटेल स्टाफ भारतीय खेळाडूंचे टिळा लावून स्वागत करताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू टिळा लावून घेत हॉटेलमध्ये प्रवेश करतात. मात्र मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि त्याच्यापाठोपाठ उमरान मलिक (Umran Malik) टिळा लावून घेण्यास नकार देतात. याच मुद्द्याला नेटकऱ्यांनी उचलून धरले असून त्यांनी हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप काही सोशल मीडिया युझर्सकडून करण्यात येत आहे. परिणामी सोशल मीडियावर या क्रिकेटपटूंविरोधात टीकेचा सूर उमटत आहे.

इतर खेळाडूंनीही नाही लावला टिळा
महत्त्वाचे म्हणजे, सिराज आणि मलिकव्यतिरिक्त इतर काही भारतीय सदस्यांनीही टिळा लावण्यास नकार दिल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि हरिप्रसाद मोहन यांनीही टिळा लावण्यास नकार दिला. परंतु केवळ सिराज आणि मलिकवर निशाणा साधत असल्याचे सोशल मीडियावरुन दिसून येते. दरम्यान सिराज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे.