भारतातील १० सर्वात घाणेरड्या रेल्वे, चुकूनही बुक करु नका तिकीट; नाहीतर होईल पश्चाताप!

Most Dirty Trains in India: गेल्या काही वर्षांत रेल्वेच्या सुविधांमध्ये अनेक सुधारणा झाल्या असल्या, तरी अस्वच्छतेच्या बाबतीत अजूनही बरेच काही करायचे बाकी आहे. राजधानी एक्स्प्रेस ते गरीब रथ आणि इतर एक्स्प्रेस गाड्यांमध्ये पसरलेल्या अस्वच्छतेमुळे प्रवासी त्रस्त आहेत. ट्विटरशिवाय रेल मदद अॅपवरही लोक भारतीय रेल्वेकडे (Indian Railway) याबाबत तक्रार करत आहेत. आज आम्ही त्या 10 रेल्वे गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांबद्दल भारतीय रेल्वेकडे अस्वच्छतेच्या सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. तुम्हीही या ट्रेनमधून प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर पुन्हा एकदा विचार करा.

रेल मदद अॅपवर आलेल्या तक्रारींनुसार, सहरसा-अमृतसर गरीब रथ ट्रेन अस्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. ही ट्रेन पंजाबमधील अमृतसरहून बिहारच्या सहरसा जिल्ह्यात जाते. ही ट्रेन दोन्ही बाजूंनी खचाखच भरते. या ट्रेनमध्ये अस्वच्छतेच्या सर्वाधिक 81 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ट्रेनच्या डब्यांपासून ते सिंक आणि टॉयलेट केबिनपर्यंत घाण पसरत असल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या आहेत. देशातील सर्वात वाईट सुविधांमध्ये या ट्रेनची गणना केली जाते.

यानंतर जोगबनी-आनंद विहार सीमांचल एक्सप्रेस ट्रेनमध्ये 67, श्री माता वैष्णोदेवी-वांद्रे स्वराज एक्सप्रेस ट्रेनमध्ये 64, वांद्रे-श्री माता वैष्णोदेवी स्वराज एक्सप्रेस ट्रेनमध्ये 61 आणि फिरोजपूर-अगरतळा त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस ट्रेनमध्ये 57 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गाड्यांमध्ये अस्वच्छता आणि घाण पसरल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या आनंद विहार-जोगबनी सीमांचल एक्सप्रेस ट्रेनमध्ये 52, अमृतसर क्लोन स्पेशल ट्रेनमध्ये 50, अजमेर-जम्मू तावी पूजा एक्सप्रेस ट्रेनमध्ये 40 आणि नवी दिल्ली-डिब्रूगड राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये 35 तक्रारी आल्या आहेत. या 10 ट्रेनमध्ये एका महिन्यात एकूण 1079 तक्रारी रेल्वेकडे आल्या आहेत.