शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरु करण्याच्या खासदार बापट यांच्या मागणीला यश

पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी केलेल्या मागणीवरुन शिवाजीनगर रेल्वे स्टेशन (Shivajinagar Railway Station) येथून पुणे-लोणावळा लोकल सेवा (Pune-Lonavla Local) सुरु करण्यास रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली असून ३० जानेवारी पर्यंत बापट यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असून पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरु होणार आहे.

खासदार बापट यांनी सांगितले की पुणे रेल्वे स्टेशन येथून परराज्यात लांब पल्याच्या गाड्यांनी तसेच पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. आणि दिवसेंदिवस ती वाढत आहे. यामुळे पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड ताण येत असून स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना वेळेत स्टेशनवर पोहचणे अवघड होते. तसेच पुणे रेल्वे स्टेशनवर इतर मुलभूत सुविधांवरही ताण येत आहे.

त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करता पुणे रेल्वे स्टेशन वरील ताण कमी करण्यासाठी शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशन वरून लोकल तसेच बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्यास पुणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होऊन पुणे स्टेशन वरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत मी मागील काही वर्षे होणाऱ्या सर्व बैठकांमध्ये तसेच प्रशासनाकडे वेळोवेळी काही रेल्वे गाड्या शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशन येथून सुरु करण्यासाठी मागणी केली.

शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशनवर नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध देण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन शिवाजीनगर ते लोणावळा या मार्गावर सध्या चार लोकल गाड्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून सुरू करणार आहे. याबाबतची सर्व तयारी रेल्वे प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून येत्या तीन चार दिवसांमध्ये खासदार बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.