नवी दिल्ली- देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले होते.
डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, श्रीमती मधुलिका रावत यांचे व छत्रपती घराण्याचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास असलेले लष्करप्रमुख आज आपल्यातून निघून गेले, हे मनाला अजूनही पटत नाही.
२०१७ साली दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवास जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी मला त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते.
छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण छत्रपती घराण्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर व अभिमान होता. मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट दिले होते, तेव्हा त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता. दिल्ली येथील माझ्या निवासस्थानी ते आले असता ताराबाई महाराणीसहेबांचे तैलचित्र पाहून त्यांनी अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याबद्दल माहिती घेतली होती व युद्धशास्त्रात त्यांचा इतिहास शिकवला जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
कोल्हापूर येथे लष्कराच्या कार्यक्रमास उपस्थित असताना मोठ्या आपुलकीने त्यांनी नवीन राजवाड्यास भेट देऊन छत्रपती घराण्याचा पाहुणचार स्वीकारला होता. जनरल रावत व त्यांच्या कुटुंबीयांशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अशा आकस्मिक व धक्कादायी जाण्याने एक मित्र व मार्गदर्शक गमावल्याची खंत मनाला लागून राहिली आहे…. संपूर्ण राष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले…जनरल रावत, श्रीमती मधुलिका रावत व त्यांच्यासोबतच्या अकरा मृतात्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली..! असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.