खासदार श्रीकांत शिंदे तुम्ही सुपर सीएम झालात का? महाराष्ट्राची माफी मागा – महेश तपासे

मुंबई  – मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून अधिकार्‍यांना आदेश देणारे खासदार श्रीकांत शिंदे तुम्ही सुपर सीएम झालात का? या वर्तनाबद्दल महाराष्ट्राची माफी मागा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो वायरल झाला असून या प्रकारावर महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत, ही राजकीय संस्कृती आहे का? वडील मुख्यमंत्री असेल तर त्याच्या अनुपस्थितीत कोणी येऊन खुर्चीवर बसू शकेल का? असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी असे वागायला नको होते. व्हीआयपी घरातील लोकांना प्रोटोकॉलचे पालन करावे लागते. एक प्रकारची सामाजिक मर्यादा जपावी लागते. वडील मुख्यमंत्री आहे म्हणून मुलगा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू शकतो का असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “ज्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसलेले दिसत आहेत ते मुख्यमंत्र्यांचं घर आहे. कुणाच्या घरात कुणी कोणत्या खुर्चीवर बसावं हा शेवटी त्या घरातील अंतर्गत प्रश्न आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी (२३ सप्टेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “ते मुख्यमंत्र्यांचं घर आहे. मात्र, मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर केवळ मुख्यमंत्रीच बसतात. आम्हीही ते अनेक वर्षे अनुभवत आहोत. उद्या कुणाच्या घरात कोणत्या खुर्च्या ठेवल्या आहेत, त्यावर कोणी बसावं कोणी बसू नये हा शेवटी घरातील अंतर्गत प्रश्न आहे. ती खुर्ची मुख्यमंत्र्यांची खुर्ची म्हणून ठेवली गेली नसेल.”

“घरात मुलं असतात, सुना असतात, भाऊ असतात किंवा इतर लोक असतात. या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यापेक्षा बेरोजगारी, महागाई याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला त्या गोष्टींचा विसर पडतो आहे.”असं म्हणत टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दादांनी कान टोचले आहेत.