खासदार सुप्रिया सुळे यांची सूचना अन् धनुभाऊंची ऑन द स्पॉट ऍक्शन…

पुणे : दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तीप्रमाणे सुखकर व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून याबाबत राज्यस्तरावर लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पुणे येथे आयोजित १२ दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या विवाह सोहळ्यादरम्यान याबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या प्रास्ताविकात धनंजय मुंडे यांना सूचना केली होती. त्यानुसार या ऑनलाईन सोहळ्यातच धनंजय मुंडे यांनी दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत राज्यसरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचलित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्यावतीने व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारातून प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या १२ दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व स्वतः कोविड बाधित असून सध्या विलगिकरणात राहून उपचार घेत असलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे, विजय कान्हेकर, अभिजित राऊत, श्रीमती दीपिका शेरखाने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वतः कोविड बाधित असूनही दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्य व इच्छाशक्तीचे कुतूहल व आदर वाटतो असे म्हणत धनंजय मुंडे व राजेश टोपे यांनी सुप्रियाताई यांना कोविडमधून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

धनुभाऊ आणि राजेश भैय्या यांच्या शिवाय हा कार्यक्रम होऊच शकला नसता – सुप्रिया सुळे

सामाजिक न्यायमंत्री आमचे धनुभाऊ व आरोग्यमंत्री राजेश भैय्या या दोघांच्या सहकार्याशिवाय हा लग्नसोहळा होऊच शकला नसता. हा सामुदायिक विवाह सोहळा केवळ एक टप्पा असून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यभरात राबवायचे आहेत, यासाठी दोघा मंत्री महोदयांनी आपल्या विभागांमार्फत सहकार्य करावे अशी सूचना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

दिव्यांग नोंदणी व युडीआयडी राज्यव्यापी मोहीम

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकाराने खासदार शरदचंद्र पवारसाहेबांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर २०२१ ते १२ मार्च २०२२ या दरम्यान दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेले वैश्विक ओळखपत्र (UDID Card) देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे युडीआयडी कार्ड असणे अनिवार्य आहे, त्यामुळे नोंदणी नसलेल्या दिव्यांग बांधवांची या विशेष मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी केली जावी यासाठी ही मोहीम राज्यभरात अधिक व्यापक पद्धतीने राबविली जाईल तसेच आरोग्य विभाग यासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती याप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

असा रंगला विवाह सोहळा…

पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यालयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व १२ जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान मास्क वापरण्यासह कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.

त्यानंतर सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व विधिवत सनई चौघड्यांच्या स्वरात हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर, अभिजित राऊत, दिपिका शेरखाने तसेच सर्वच आयोजकांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांनीच कौतुक केले.