कसब्यातील उमेदवारी बाबत पहिल्यांदाच बोलले शैलेश टिळक; म्हणाले, मी आणि माझा मुलगा…

Pune : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप (Kasba MLA Mukta Tilak and Chinchwad MLA Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाने (Central Election Commission) या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, कसबा मतदार संघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असताना या दरम्यान मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची प्रतिक्रिया आली आहे. शैलेश टिळक म्हणाले की, टिळक परिवारात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. मुक्ता टिळक यांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केले आहे. मुक्ता टिळकांचं मतदार संघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा आहे. पण कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असेही म्हणाले आहेत.

तुम्ही निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर बोलताना शैलेश टिळक म्हणाले की, जर पक्षाने संधी दिली तर मी ही निवडणूक लढवण्यास तयार आहे. मी अनेक वर्ष मुक्तांसोबत काम केलेल आहे. माझा मुलगा कुणाल देखील चांगलं काम करत आहे. त्यामुळे परिवारात उमेदवारी मिळावी, अशी आमची इच्छा असली तरी पक्षाचा निर्णय आम्हाला बांधील राहिल.