भाजप आमदार मुक्ता टिळक याचं निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

पुणे- पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे उपचारदरम्यान निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. मुक्ता टिळक गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  (  BJP MLA Mukta Tilak passed away)

कसबा मतदार संघात त्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्या आधी पुण्याच्या अडीच वर्ष महापौर होत्या. त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात नगरसेवक या पदावरुन केली. त्या चार वेळा पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवक होत्या. त्यांच्या पश्चात पती शैलेश, मुलगा कुणाल आणि मुलगी चैताली असा परिवार आहे.

भाजप संघटनेमध्ये त्यांनी विविध पदे भुषवली होती. दरम्यानच्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऍम्ब्युलन्समध्ये जाऊन मतदान केले होते. त्यावेळी त्यांच्या पक्षनिष्ठेची मोठी चर्चा झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या या पक्षनिष्ठेचे कौतुक केले होते.