मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई, एक हजार कोटींचे 513 किलो ड्रग्ज जप्त

Mumbai – मुंबई अँटी नार्कोटिक्स (Anti Narcotics) सेलच्या वरळी युनिटने गुजरातच्या (Gujrat) भरूच (Bharuch) जिल्ह्यात ड्रग्ज (Drugs) बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी भरूचमधील अंकलेश्वर परिसरातून सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1,026 कोटी रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह सात आरोपींनाही अटक केली आहे. यापैकी ५ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून दोन आरोपी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कोठडीत आहेत.

यापूर्वी मार्च महिन्यात शिवाजी नगरमधून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ड्रग्जची खेप पकडली होती, तेव्हापासून पोलिस त्याचा स्रोत शोधण्यात गुंतले होते. ही खेप पकडण्यासाठी मुंबई पोलिसांना पाच महिने संघर्ष करावा लागला. मार्च महिन्यापासून मुंबई पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी कक्ष यावर सातत्याने काम करत होता. अनेक राज्यांत पसरलेली ही आंतरराज्यीय ड्रग्ज टोळी असल्याचे पोलिसांना वाटते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी विशेषतः तरुणांना टार्गेट करते. ही औषधे हाय प्रोफाईल सर्कलमध्ये पुरवली जातात. 29 मार्च रोजी मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने मुंबईतील शिवाजी नगर परिसरातून अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली दोघांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे साडेचार कोटी रुपयांचा एमडी (ड्रग्ज) साठाही जप्त केला आहे. तेव्हापासून पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला होता.