महाआरतीची मनसेकडून जंगी तयारी; अमित ठाकरे स्वतः महाआरतीमध्ये सामील होणार
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला. सोबतच भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य करत 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, कालच्या भाषणांनंतर आता मनसेने उद्याच्या महाआरतीची तयारी सुरु केली आहे. या अगोदरच राज ठाकरे यांच्या आवाहनाने वातावरण तापलेले आहे. त्यातच उद्या अक्षय तृतीया आणि मुस्लीम धर्मीयांचा ईद हा सण असल्याकारणाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांकडून ( mumbai Police notice to MNS party workers before Maha Aarti ) मुंबईमध्ये मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अक्षय तृतीया (Akshay Tritiya) असल्याकारणाने या पद्धतीने महाआरतीचे आयोजन करण्यात येत असल्याचे मनसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, उद्या मुस्लीम धर्मीयांचा ईद हा सण असल्याकारणाने यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना 149 च्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मनसे नेते अमित ठाकरे स्वतः प्रभादेवी येथील महाआरतीमध्ये सामील होणार आहेत.