पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे हात मुंबईकरांच्या हत्येत माखलेले; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

मुंबई – गेल्या पाच वर्षात मुंबई महापालिकेने ११ लाख ५२ हजार ११५ उंदीर मारले तर ते पूरले कुठे? एवढे उंदीर मारले तर मग हॉस्पिटलमधे रुग्णांचे डोळे, कान उंदराने कसे खाल्ले? वाघ म्हणवता आणि उंदीर पण खाता का? अशा एकापेक्षा एक प्रश्नांचा भडिमार करत भाजपा आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या परिवारवादाला, भ्रष्टाचाराला, घराणेशाहीला मुंबईकर कंटाळले असून त्यांना सुटका हवी आहे. मुंबईत गेल्या पाच वर्षात घडलेल्या दुर्दैवी मृत्यूंना जबाबदार धरत पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे हात हत्येत माखलेले आहेत, असा गंभीर आरोप भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

मुंबईच्या विविध प्रश्नांवर आज विधानसभेत  सत्ताधारी पक्षातर्फे नियम २९३ नुसार प्रस्ताव मांडण्यात आला असून आमदार अँड आशिष शेलार यांनी हा प्रस्ताव मांडला. यावर बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी गेली २५ वर्षे महापालिकेत सत्ता करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

मुंबईकरांच्या माथी गेल्या २५ वर्षांमध्ये तीच घराणेशाही, तोच परिवार त्यांच्या जवळचे कंत्राटदार,  त्यातून निर्माण होणारा भ्रष्टाचार आणि त्यामुळे झालेली दुर्व्यवस्था यांतून मुक्ती मिळावी यासाठी मुंबईकर आवाज उठवत आहेत. मुंबई महानगरपालिकेत असणारं एकाच परिवाराचं सरकार प्रयोगशील कृतिशील विकासात्मक कार्यक्रम हाती घेऊन सर्वसमावेशक कार्य करेल अशी अपेक्षा असताना पदरी निराशाच आली असल्याची मुंबईकरांची व्यथा भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी मांडली. सर्व प्रकारचे कर भरूनही त्या बदल्यात घरामध्ये वेळेत शुद्ध पाणी आणि खड्डेमुक्त रस्ते ही मुंबईकरांची माफक मागणीही पूर्ण होत नाही. गेल्या २५ वर्षांत एकाच गावातील त्याच त्याच ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांना कंत्राटं देऊन मुंबईचं वाटोळं केल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

मुंबईमध्ये उपकर प्राप्त इमारती १७६८१ असून केवळ १३ ते साडे १३%  इमारतींचा विकास झाला. पावसाळ्याच्या काळात दर पावसात एखाद दुसरी इमारत पडते आहे, त्यात लोक प्राण गमावत आहेत. तरीही महानगरपालिकेने त्याबद्दल सर्वंकष विकासाचा एकत्रित विचार करून एकदाही कार्यक्रम हाती घेतला नाही. १९९१ च्या जुन्या विकास आराखड्यातील शहराच्या विकासाच्या धोरणानुसार आरक्षित भूखंडावर मुंबईचा विकास व्हावा अशी अपेक्षा असतानाही गेल्या विकास आराखड्यातील विकास केवळ ३३.६५% असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून देत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढले.

मुंबईच्या आरोग्याचा अर्थसंकल्प आणि मुंबईची लोकसंख्या यांची सांगड होते आहे का, याबद्दलही भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी महानगरपालिका प्रशासनावर सवाल उपस्थित केले. १ कोटी ४० लाख लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराच्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वर्षाचे बजेट ६ हजार ३०९ कोटी रुपये आहे. त्या हिशेबाने ५ वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्यासाठी ३१ हजार ५४७ कोटी रुपये खर्च करत असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे सांगणे आहे. ५६ लाख मुंबईकरांसाठी हा खर्च होत असून प्रति कुटुंब २ लाख २६ हजार रुपयांचा खर्च होत असूनही इस्पितळांमध्ये औषधे, उपचारांची सामुग्री यांची मात्र वानवाच असते. त्यामुळे हे ३१ हजार ५४७ कोटी रुपये जातात कुठे, असा सवाल भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी विचारला.

तसेच ५ वर्षांमध्ये ३ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांवर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा १६ हजार ७३५ कोटी रुपये खर्च करत असल्याचा दावा खोडून काढताना भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी महानगरपालिकेच्या बंद पडणाऱ्या मराठी शाळा, ढासळलेली गुणवत्ता, शाळांची दुरावस्था यांच्यावर प्रश्न उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना त्यांनी कोरोना काळात मुंबईकरांना एकही टेस्ट मोफत केली नाही. मात्र मोठमोठ्या खासगी विकासकांसाठी मुंबई महानगरपालिकेला मिळणाऱ्या कायदेशीर आमदनीचा प्रीमियम ५०% माफ केला आणि त्यामुळे मुंबईकरांच्या १२ हजार कोटी रुपयांवर पाणी सोडले. त्यामुळेच मुंबईमध्ये आज पर्यावरणाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईकरांचे प्राण संकटात आले असल्याकडे भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी लक्ष वेधले.

सार्वजनिक वाहनव्यवस्थेला गती देण्याची गरज असतानाही मेट्रोच्या कामाला स्थगिती देऊन ठाकरे यांच्या सरकारने मुंबईकरांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

दर वर्षाला मुंबईत अग्निशमन दलाचं वार्षिक बजेट ६६६ कोटी रुपये आहे. ५ वर्षांमध्ये सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्च केल्याचा दावा असूनही जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ वर्षभरात ४४१७ आगीच्या घटना घडल्या आहेत. ५ वर्षांमध्ये केवळ खड्डे बुजवण्यावर २८५ कोटी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना न्याय मिळाला नाही. डॉ. दीपक अमरापूरकरांसारखे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आपण गमावले आहेत, याचीही भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी आठवण करून देत मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारावर प्रश्न उपस्थित केले.

मुंबई महापालिकेकडे मुषक संहारकांची मोठी फौज असूनही कधीही उंदीर मारण्याचे काम सुरू असल्याचे कधीही दृष्टीस पडले नाही. वर्षाला २ लाख ३० हजार ४२३ उंदीर मारल्याचा दावा महानगरपालिकेकडून केला जातो. त्यानुसार ५ वर्षांत जर ११ लाख ५२ हजार ११५ उंदीर मारले गेले असतील तर ते पुरले कुठे? त्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची टीका भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. उंदीर मारण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून काळ्या उंदरांची श्वेतपत्रिका काढण्याची गरज असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले. उंदीर मारले गेले असतील, तर २०१७ यकृतावरील उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयांत दाखल झालेल्या कुर्ल्यातील रहिवासी श्रीनिवास येलप्पा यांचा कान उंदराने खाल्ल्याची दुर्घटना कशी घडली, असा सवाल शेलार यांनी विचारला. अशाच स्वरूपाची घटना २०१८ मध्येही घडली असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये दाखल २७ वर्षीय युवकाचे डोळे उंदरांनी डोळे कुरतडले असल्याचा हृदयद्रावक अनुभव सांगत मुंबईकरांच्या रक्ताने पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचे हात माखले असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.