भोंग्यांचा वाद : नाशिकमधील मुस्लिम नगरसेवकांचा राज ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा

नाशिक – मनसेचे (MNS)  प्रमुख राज ठाकरे (raj Thackeray) यांनी नुकत्याच केलेल्या भाषणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे यांनी आपल्या भाषणात भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्याने नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला भोंग्याच्या प्रकरणावरून पुण्यात मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी राजीनामाही दिला  असताना  नमाज अदा करण्यासाठी भोंगे कशाला असं म्हणत नाशिकमध्ये (Nashik) मुस्लिम नगरसेवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

या प्रकरणी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह इतर मुस्लिम नगरसेवक राज ठाकरे यांची उद्या मुंबईत भेट घेणार आहेत. मशिदींवर भोंगे लावलेच नसते, तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. मशिदींनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही नगरसेवक सलीम शेख यांनी केले आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतिर्थावर झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या (masjid) बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा दिला होता.